ग्लोबल हँडवॉशिंग दिनानिमित्त जनजागृती उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
‘हँड इन हँड इंडिया’ संस्थेच्यावतीने दि. 15 ऑक्टोबर रोजी ग्लोबल हँडवॉशिंग दिन शैक्षणिक आणि सामाजिक उत्साहात साजरा करण्यात आला. मायनी कोयना, फणशीचीवाडी, वावोशी, गोरठण आणि परखंदे या पंचक्रोशीतील झेडपी शाळांमध्ये एकूण 175 विद्यार्थी आणि 11 शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या अभियानाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवणे, योग्य हात धुण्याच्या सात पद्धती शिकवणे आणि दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी रूजवणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात झेडपी शाळा मायनी कोयना येथे विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅलीने झाली. ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’ आणि ‘हात धुवा, आजार टाळा’ अशा घोषणांनी परिसरात स्वच्छतेचा संदेश पोहोचवला.
यानंतर शिक्षक व ‘हँड इन हँड इंडिया’च्या प्रतिनिधींनी हात धुण्याच्या टप्प्यांचे प्रात्यक्षिक दाखवीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सराव करवून घेतला. फणशीची वाडी, वावोशी, गोरठण आणि परखंदे शाळांमध्येही समान उपक्रम राबवण्यात आला. शिक्षकांनी हात धुण्याचे महत्त्व जेवणापूर्वी, शौचालयानंतर व खेळानंतर समजावले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण झाली असून, त्यांनी शाळा व घरात स्वच्छतेची सवय पाळण्याचा संकल्प केला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांमध्ये ही सवय सातत्याने रुजवण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी ठरून शाळांमध्ये स्वच्छ, निरोगी आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यास हातभार लावणारा ठरला.







