। रायगड । आविष्कार देसाई |
कोकणात भाजपाने ऑपरेशन लोटस सुरु केले आहे. शिवसेनेच्या मशाल चिन्हावर विधानसभेची निवडणूक हरलेल्या महाडच्या स्नेहल जगताप या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्यात होळीचा सण आटोपल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना हा फार मोठा झटका असल्याचे बोलले जाते.
भाजपाने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून कोकणातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपाचे नेते सतीश धारप यांच्यावर फोडोफोडीची जबाबदारी असल्याचीहो जोरदार चर्चा आहे. दरम्यान, याबाबत सतीश धारप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. राजकीय परिवर्तनाची जोरदार चर्चा सुरु असताना मात्र स्नेहल जगताप यांनी पक्ष प्रवेशाचे खंडन केले नसल्याचे दिसून येते. राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.
राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौर्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचा मुहूर्तही त्यांनी सांगितला. शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार असून, त्याची सुरुवात रत्नागिरीतील माजी आमदारांपासून होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. त्यामुळे राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे.
रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांच्यासोबत अजून चार आमदारही सेनेत येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोबतच काँग्रेसचे पाच आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदारही शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
दुसरीकडे काँग्रेसचा हात सोडून शिवसेना ठाकरे गटात स्नेहल जगताप या सामील झाल्या होत्या. स्नेहल या काँग्रेसचे माजी नेते माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. 2014 ची महाड विधानसभेची निवडणूक स्नेहल यांनी लढवली होती. सुमारे 92 हजार मते मिळवूनही त्यांना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना हरवता आले नाही. स्नेहल जगताप निवडणूक हरल्यानंतर निराशेच्या छायेत होत्या. पुढे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न त्यांचे समर्थक त्यांना विचारत होते. त्यानुसारच स्नेहल या भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्नेहल जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
….तर शिवेसेना नेतृत्वहीन होईल
स्नेहल जगताप यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास दक्षिण रायगडमधील ठाकरे गटाची शिवसेना नेतृत्वहीन होणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकाकी पडण्याची शक्यता आहे. महाड विधानसभा मतदारसंघामध्ये माणिक जगताप यांच्या माध्यमातून काँग्रेस चांगलीच तळागाळात रुजली होती. त्यानंतर स्नेहल यांनी जबाबदारी स्वीकारली होती. नंतर त्यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेची मशाल हाती घेतली होती. आता त्या भाजपाचे कमळ हाती घेणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पदाधिकार्यांना चुचकारण्याचा प्रयत्न
महाडमध्ये राजकीय बदल झाला तर, शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत काय करणार, असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आपले करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते. आपण शिवसैनिक एकच आहोत. त्यामुळे भाजपामध्ये जाण्यापेक्षा आमच्याकडे या, असे मंत्री भरत गोगावले यांनी तसा संदेश त्यांना पाठवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.