विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
लायन्स क्लबने लायन्स फेस्टीवलची 18 वर्षाची परंपरा जपत वेगवेगळ्या व्यावसायिकांना हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिकांना एका छताखाली खाद्य पदार्थांसह वस्तु खरेदी करता यावे, यासाठी अलिबाग समुद्रकिनारी यंदाही लायन्स फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 23 ते 27 जानेवारी या पाच दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या फेस्टीवलचा उद्घाटन समारंभ गुरुवारी (दि.23) सायंकाळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात पार पडला. यावेळी मान्यवरांचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी वेगवेगळ्या स्टॉलची पाहणी केली. फेस्टीवलच्या माध्यमातून ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू, खाद्य पदार्थ खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने मान्यवरांनी आयोजकांचे कौतूक केले.
यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अनिल चोपडा, संजना किर, लायन्स इंटरनॅशनल संचालक पंकज मेहता, एन.आर. परमेश्वरन, संजीव सुर्यवंशी, प्रवीण सरनाईक, विजय वनगे, प्रीतम गांधी, फेस्टीवल समितीचे अध्यक्ष नयन कवळे, संतोष पाटील, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी आदी लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच अलिबागकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्यदिव्य अशा फेस्टीवलच्या शुभारंभाला अलिबागकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हँगर पद्धतीचे विस्तीर्ण दालन, सायमा पद्धतीचे अत्याधुनिक स्टॉल्स, जागतिक बाजारपेठेत नामांकित ब्रँड असलेल्या मीनल मोहाडीकर यांचे कंजूमर शॉपी या संस्थेच्या सहयोगातून सहयोग पावणेदोनशेहून अधिक स्टॉल्स महोत्सवामध्ये ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वस्तूंसह चटकदार व्हेज, नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खवय्यांसाठी पर्वणी आहे. महिला बचत गटांचेदेखील या फेस्टीवलमध्ये स्टॉल उभारण्यात आले आहेत. सायंकाळपासून ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वेगवेगळ्या वस्तू, खाद्य पदार्थ खरेदीला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाच दिवस ग्राहकांनी एक वेगळी संधी या फेस्टीवलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
पाच दिवस वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक, असे वेगवेगळे उपक्रम राबवून नागरिकांचे मनोरंजन केले जाणार आहे. पाचव्या दिवशी म्हणजे महोत्सवाचा सांगता समारंभ सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. यावेळी इंडिएसा फ्युजन बँडचा कार्यक्रम होणार आहे. अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवाची शान वाढवणार आहे. या महोत्सवाला अनेक मान्यवर भेट देऊन महोत्सवाचा आनंद लुटणार आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात सिंहाचा वाटा
अलिबागला टप्प्या टप्प्याने बदलता पाहिले आहे. सामाजिक सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या संस्थांमार्फत होत असताना आनंद वाटत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यामध्ये लायन्स क्लबचा सिंहाचा वाटा राहिला आहे. लायन्स क्लब ही संस्था जगात कार्यरत आहे. फेस्टीवल सारखा उपक्रम राबवून लायन्स क्लब चांगली सेवा देण्याचे काम करीत आहे. अलिबागला तिसऱ्या मुंबईचा दर्जा मिळणार आहे. रेवस करंजाचे काम लवकरच पुर्ण होणार आहे. त्यामुळे मंत्रालय ते अलिबागचा प्रवास अवघ्या 30 मिनीटात गाठता येणार आहे. लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन खारीचा वाटा देऊन सेवा करण्याचे काम अलिबागकर नक्की करतील असा विश्वास आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी मत व्यक्त केले.