। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आठ वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीत असताना मी लक्ष द्यायला सुरूवात केली. 28 कोटी कर्जावरून आज 11 कोटींवर आणलं आहे. यादरम्यान शाळा, कॉलेजच्या इमाराती सुधारल्या, विधी महाविद्यालय, सीबीसी ज्यु. कॉलेज सुरू केलं, नर्सिंग कॉलेज सुरू करतो आहे. या सर्व परवानग्या मी आमदार असताना घेतल्या आहेत. सुरू असलेल्या संस्थेच्या कारभाराकडे माझं पूर्ण लक्ष असल्याने संस्थेचा कारभार स्वच्छच आहे. चुकीची माहिती पसरून खोपोलीची शान असलेली संस्थेची बदनामी करू नका, पत्रकारांना काय माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधा, असे प्रतिपादन माजी आमदार जयंत पाटील यांंना पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ प्रसिद्ध आहे. शिक्षण संस्थेत प्रचंड घोटाळा असल्याची चर्चा सुरू असल्याने जयंत पाटील यांनी गुरूवारी (दि.23) केटीएसपी मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन संचालकांडून आढावा घेतला. यावेळी माजी अध्यक्ष, विद्यमान ज्येष्ठ संचालक दत्ताजीराव मसुरकर, अध्यक्ष संतोष जंगम, किशोर पाटील, अबू जळगांवकर, राजू ठक्कर, दिलीप पोरवाल, दिनेश गुरव, अनंता हाडप, नरेंद्र शहा, चंद्रकांत केदारी, भास्कर लांडगे, विजय चुरी, कैलास गायकवाड, संजय पाटील, जितू रावळ उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी संस्थेच्या कारभाराबाबत आढावा घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, माजी राज्यमंत्री स्व. बी.एल. पाटील, के.बी. पाटील, साखरे, तन्ना यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठीत लोकांनी शिक्षण संस्था स्थापन केली. आज जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळख आहे. संस्थेवर कर्ज झाल्यावर संस्थेला कर्ज देऊन उभी करण्याचे काम मी केलं, यावेळी मागील सर्व सदस्यांनी राजीनामे दिले होते. दत्ताजीराव मसुरकरांचे मोठे योगदान असल्याने त्यांना मुद्दाम संस्थेवर ठेवण्याचे काम केले. खोपोलीतील व्यापारी माझ्या आग्रहाखातर संस्थेच्या संचालकपदावर स्वतःचे पैसे भरून आलेत आणि स्वच्छ कारभार करीत आहेत. त्यांना व्यक्तिगत कोणी त्रास देणार असेल, तर त्यांची जबाबदारी माझी असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, मला शिक्षण संस्थेत राजकारण आणायचं नसल्याने संस्थेत तीनच वेळा आलो आहे. त्यामुळे कोणीही संस्थेच्या कारभारात राजकारण आणू नका, बदमानी करू नका आणि राजकीय अड्डा बनवू नका, अशी विनंती केली. शिक्षण संस्थेच्या कारभाराबाबत पोलीस विचारू शकत नाही, धर्मादाय आयुक्त विचारू शकतात, त्यालाही मर्यादा असल्याचे सांगत उठलेल्या वादळाचा प्रश्न माझ्या दृष्टिने संपला असल्याचे जयंत पाटील शेवटी बोलताना म्हणाले.
पालकमंत्रीपदाचा प्रश्न न सुटणारा
पालकमंत्र्याला एवढं महत्त्व असतं, हे कधीच समजलं नव्हतं. पालकमंत्रीपदावरून सध्या वाद सुरू झाल्यानंतर महत्त्व समजलं आहे. पालकमंत्रीपदाचा वाद रस्त्यावर सुटणारा नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात तो सुटेल. मी मारतो, तू थोपट असे तटकरे आणि गोगावले करीत असल्याची टीका माजी आ. जयंत पाटील यांनी दोघांचेही नाव न घेता केली आहे.