लाखोंची रोकड जळून खाक
। पुणे । प्रतिनिधी ।
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात असलेल्या काशीद पार्कजवळील एका बिगारी कामगाराच्या घराला गुरुवारी (दि.23) भीषण आग लागली. या आगीत या कामगारांचे अंदाजे 5 लाख रुपये जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, दाट लोकवस्तीमुळे अग्निशमन बंबाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. आग 20 मिनिटांत आटोक्यात आणण्यात आली. यात 20 पत्र्याची घरे उद्ध्वस्त झाली असून, सुमारे 5 लाख रुपये रोख रक्कम आणि 5 तोळे सोन्याचे दागिने असे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तविला आहे.