| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायत मधील पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील डोंगराखाली वसलेल्या ठोंबरवाडी मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. तेथे लाईट ऑफ लाईफ आणि राजकमल नयन बजाज फाउंडेशन यांनी आपल्या सामाजिक दायित्व फंडातून नळपाणी योजना राबविण्यात आली.स्थानिकांच्या सोयीसाठी राबविब्यात आलेल्या या नळपाणी योजनेचे लोकार्पण संबंधित संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या ग्रामपंचायत मधील ठोंबरवाडी ही 40 घरांची वस्ती असलेले गाव. पुणे जिल्ह्याची हद्द असलेल्या डोंगराच्या खाली असलेले लहानसे गाव. पावसाळ्यात येथील वातावरण कोणालाही प्रफुल्लित करणारे असल्याने असंख्य फार्महाऊस या भागात उभे राहिले आहेत. त्या सर्वांनी सोलनपाडा धरणातून वाहणारे पाणी ज्या नदीमधून पुढे वनविहार भागात वाहत येते.तेथून विहिरीच्या माध्यमातून आपल्या फार्महाउसमध्ये पाणी आणले आहे. मात्र ठोंबरवाडी गावाची तहान भागविणे महत्वाचे आणि पुण्याचे काम असताना त्यासाठी कोणतेही फार्महाउस मालक पुढे आले नाहीत.कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी लाईट ऑफ लाईफ संस्था पुढे आणि त्या संस्थेकडे स्थानिक लोकांनी आपल्या पाण्याची समस्या मांडली.
लाईट ऑफ लाईफ संस्थेच्या पुढाकाराने राजकमल नयन बजाज फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून नळपाणी योजना राबविण्याचा निर्णय झाला.त्यानुसार धरणाचे पाणी वाहत असलेल्या उपनदीवर विहीर खोदून पाणी वाडीपर्यंत आणण्याचा निर्णय झाला.त्यासाठी विहीर खोदण्यास सुरुवात केली असता 60 फूट खोदल्यावर विहिरीमध्ये भरपूर पाणीसाठा आढळून आला. त्यानंतर विहिरीचे आरसीसी बांधकाम पूर्ण करून त्या विहिरीमध्ये कोणतेही साहित्य जाऊन पाणी दूषित होऊ नये यासाठी जाळी लावण्यात आली आहे.त्या विहिरीमधून पाणी ठोंबरवाडीमध्ये आणण्यात आले आणि नळाद्वारे सर्व ग्रामस्थांना देण्यात आले. या यशस्वी ठरलेल्या नळपाणी योजनेचे लोकार्पण लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे पदाधिकारी आणि राजकमल नयन बजाज फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी या संस्थांच्या प्रतिनिधी यांनी पाणी पुरवठा सुरु करण्याची फीत स्थानिक लहान मुलींच्या हस्ते कापली.