14 डिसेंबर रोजी एकदिवसीय आंदोलन
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
कुणबी दाखला प्रश्नांवर रोहा तालुका कुणबी समाज येत्या 14 डिसेंबर रोजी रोहा तालुक्यात एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडणार आहे. यासाठी तालुक्यातील प्रमुख नेते तसेच युवक मंडळाचे पदाधिकारी गावोगावी फिरून दाखला प्रश्नांवर जनजागृती करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणीसाठी 1967 पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट रद्द झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी रोहा तालुका कुणबी युवक मंडळ, कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन गुरुवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 10 वाजता करण्यात येणार आहे. जोपर्यंत आपल्याला जातीच्या दाखल्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आता मागे हटणार नाही, असा निर्धार येतील कुणबी समाज बांधवांनी केला आहे.
कुणबी समाज नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी समन्वयक सुरेश मगर, रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे, उपाध्यक्ष शंकर भगत, युवक अध्यक्ष अनंत थिटे यांनी जनजागृती करत आंदोलनात बहुसंख्येने कुणबी बांधव तसेच युवक, युवती, महिलांनी सहभाग होण्याचे आवाहन केले आहे.
