चालक जखमी; चोळईतील तीव्र वळणाचा उतार ठरतोय धोकादायक
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील चोळईतील तीव्र वळणाचा उतार गेल्या अनेक वर्षांपासून महामार्ग रुंदीकरणापूर्वीही धोकादायक ठरलेला असून, शनिवारी (दि.28) दुपारी याच वळणावर शीतपेयांचा ट्रक कलंडल्याने चालक जखमी झाला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणावेळी धोकादायक वळणे तसेच तीव्र वळणाचा उतार कमी करून चौपदरीकरण न झाल्याने चोळईतील तीव्र वळणाचा उतार रूंदीकरणापूर्वीपासून गेली अनेक वर्षे धोकादायक ठरत आहे. चोळईतील तीव्र उतारावर रिक्षेतील विद्यार्थिनींचा अपघात, आ. योगेश कदम यांचा अपघात तसेच अनेक अपघात सातत्याने होत आहेत.
शनिवारी, दुपारी रत्नागिरी येथून मुंबईच्या दिशेने शीतपेयांच्या बाटल्यांचे पॅकिंग घेऊन निघालेल्या ट्रक (क्र. एमएच 46 सीक्यू 5186) कशेडी घाटरस्त्यावरील चोळईतील तीव्र वळणाचा उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कलंडला. यामुळे झालेल्या अपघातामध्ये ट्रकचालक जखमी झाला. चालकाला तातडीने पोलादपूर ग्रामीण रूग्णलयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश पवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघातप्रकरणी पोलादपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.






