पाली भूतिवली कालव्याची माती चोरीला

पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने पाली भूतिवली धरणाची बांधणी केली होती. परंतु, या धरणातले पाणी 25 वर्षांनंतरदेखील शेतीसाठी मिळाले नाही. मात्र, आता त्याच धरणाच्या कालव्यातील मातीची चोरी सुरू असून, शासन डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे गप्प आहे. दरम्यान, ते कालवे खोदण्यासाठी आलेला नऊ कोटींचा खर्च धरणाचे प्रमुख अधिकारी यांच्याकडून वसूल करून घ्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

कर्जत तालुक्यातील कर्जत-नेरळ रेल्वे पट्टा भागातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी पाली भूतिवली धरणाला मंजुरी देऊन कामाला सुरूवात करण्यात आली होती. 2003 मध्ये धरणाच्या मुख्य जलाशयात पाणीसाठा झाल्याने परिसरातील जमिनीची भूजल क्षमता वाढली. त्याच धरणाच्या पाण्याचा वापर हा प्रामुख्याने शेतीसाठी होणार होता. त्यासाठी 15 किलोमीटर लांबीचे कालवे खोदले जाणार होते. सन 2006 साली कालवे खोदण्यास सुरुवात झाली. त्यासाठी शासनाने तब्बल 9 कोटी रुपये खर्चदेखील केले आहेत. मात्र, जेमतेम 6 किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झाले असून, संपूर्ण कालव्यांची कामे आजही अपूर्ण आहेत. असे असताना त्या कालव्यात पाणी सोडण्याची तयारी गेल्या 20 वर्षांत पाटबंधारे खात्याने दाखवली नाही आणि त्यामुळे कालवे असूनदेखील त्यातून पाणी वाहात नाही.
अशातच शनिवारी (दि.21) रात्रीच्या वेळी पाली भूतिवली धरणाच्या मुख्य कालव्यांवरील माती काढून अन्य ठिकाणी भराव करण्यासाठी नेली जात आहे. हा प्रकार अत्यंत संशयास्पद असून, कालव्यांचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निर्माण होत आहे. शासनाने खोदलेल्या कालव्यातील माती ट्रक भरून नेली जात असल्याने ते उत्खननप्रकरणी आणि शासनाने खर्च करून बांधलेल्या कालव्यातील माती काढल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, तात्काळ चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी/यंत्रणेवर योग्य ती कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना न्याय देत कालव्यांचे काम पूर्ण करण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना 20 वर्षांचे भू-भाडे देण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व शेतकरी करीत आहेत.

Exit mobile version