ऊर्जामंत्र्यांनी केली रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरीकांना डॉ राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे.
अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेण, महाड,नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यावेळेस उपस्थित होते.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले
महाड येथे सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरच्या ठिकाणी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळी डॉ राऊत यांनी पाहणी करत वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पूरग्रस्त काळातील कामगिरी कौतुकास्पद असल्याची पावती त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिली. महाड तालुक्यातील वीज यंत्रणेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी या उपस्थित होत्या. डॉ. नितीन राऊत यांनी महाड येथील दौरादरम्यान दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यानंतर ऊर्जामंत्री यांनी राजावाडी तसेच विरेशवर गावातील बाधित झालेल्या विद्युत यंत्रणेची पाहणी केली. तसेच महापारेषण अतिउच्च्दाब केंद्राची पाहणी केली.
22 जुलै रोजी सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे उच्चदाब वाहिनीचे दोन टॉवर पडल्याने महाड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तथापि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे २६ जुलै रोजी महावितरणच्या गोरेगाव स्विचिंग उपकेंद्रातून बॅक फिडर मार्फत २२ के.व्ही. लोणेरे फिडर द्वारे २२ के.व्ही वाहूर फिडर चालू करून ८० गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू करण्यात आला असल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांचे कौतूक
महावितरण,महापारेषणच्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर वीज खाते करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असताना देखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत. त्यांना मी सलाम करतो, त्यांच्या या कामगिरीमुळे आमची छाती अभिमानाने फुलून आली असे गौरवोद्गार डॉ राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांप्रति काढले.
पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत. बाधित झालेल्या १३०८ वितरण रोहित्रांपैकी २६१, ४७१ पाणीपुरवठा योजनांपैकी २९ तर ८ कोविड हॉस्पिटल/ व्हॅकसीनेशन सेंटरपैकी ३, ८३ मोबाईल टॉवरपैकी १९ असे एकूण ३५,५६० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.
गरजूंना वस्तूंचे वाटप
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,सबोर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन व काँग्रेस पक्षाच्या वतीने महाड येथील बौद्ध वाडी व अदिवासी वाडी येथे पूरग्रस्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वितरण डॉ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.