चिन्ह नव्हे, उमेदवार पाहून सैनिकांचे मतदान

ईटीपीबीएस पोर्टलच्या मदतीने बजावतात हक्क

। सांगली । वृत्तसंस्था ।

नाव, फोटो अन् चिन्ह असं चित्र ईव्हीएमवर पाहून सामान्य लोक मतदानाचा हक्क बजावतात; तर लष्करातील जवान आणि अधिकारी ईपीबीद्वारे लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतात. विशेष म्हणजे सैनिकांच्या मतपत्रिकेत उमेदवाराचे नाव, फोटो असतो, मात्र चिन्ह नसते. त्यामुळे सैनिकांना चिन्ह नव्हे तर उमेदवार पाहून मतदान करण्याची संधी मिळते.

लष्करातील सैनिकांसाठी ईटीपीबीएस पोर्टलद्वारे मतदान प्रक्रिया राबवली जाते. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पोर्टलवर नाव नोंदणी करण्यात आली. त्यानंतर लष्कराच्या रेकॉर्ड ऑफिसकडून विधानसभा मतदारसंघनिहाय असलेल्या ईआरओकडे मतदारांची यादी येते. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी ईआरओकडून ही यादी अंतिम केली आहे. ईआरओकडून ईटीपीबीएस पोर्टलवर यादी टाकली जाते. त्यानंतर 7 अ प्रमाणे ई-पोस्टल बॅलेट तयार करण्यात येते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ते रेकॉर्ड ऑफिसला पाठविले. सोबत 13-ए, बी, सी या लिफाफ्याचे नमुने तसेच स्वयंघोषणापत्र नमुना, मार्गदर्शक सूचनादेखील पाठविण्यात आल्या आहेत. ही सामग्री डाऊनलोड करण्यासाठी सात दिवसांची मुदत असते. म्हणजे 5 ते 12 नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

रेकॉर्ड ऑफिस आणि युनिट ऑफिस त्याच्या प्रिंट काढून संबंधित सैनिकांना मतपत्रिका देत आहेत. ई-पोस्टल बॅलेटवर उमेदवारांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत नाव आणि फोटो असतो. त्यापुढे खूण करण्यासाठी रिक्त रकाना आहे. टिकमार्क केल्यानंतर 13 ए डिक्लेरेशन, 13 बी मतपत्रिका हे 13 सी या लिफाफ्यात बंद करण्यात येते. हा लिफाफा पोस्टाद्वारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पाठविला जात आहे.

मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंतचे आलेले लिफाफे ग्राह्य धरले जाणार आहेत. कालावधी झाला कमीलोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण प्रक्रियेसाठी 43 दिवस मिळाले होते. विधानसभेसाठी केवळ 19 दिवस आहेत. त्यामुळे यावेळी किती मतदान होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 2019 पूर्वी पोस्टल बॅलेट हे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना छापून लष्कराकडे पाठवावे लागत होते, ते परत पोस्टाने मिळायचे. यासाठी अधिक कालावधी लागत होता. त्यामुळे ही नवी पद्धत कमी वेळेत आणि सुरक्षित मतदानासाठी उपयुक्त असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version