महाड वसाहतीमधील घनकचरा महामार्गालगत

कंपनी व्यवस्थापकांनी हात झटकले
। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगाव हद्दीत महामार्गालगत सोमवारी दुपारच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने औद्योगिक वसाहतीमधील घातक घनकचरा महामार्गालगत टाकून पलायन केले. ही बाब दासगाव ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांना तातडीने कल्पना दिली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड यांनी तात्काळ या घातक घनकचर्‍याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. तर महाड औद्योगिक क्षेत्रातील पिगमेंट तयार करणार्‍या पाच कारखान्यांच्या व्यवस्थापकांकडून यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे.

महामार्गावर कचरा टाकल्याची कल्पना दासगाव ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर त्या ठिकाणचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले. याप्रकरणी महाड औद्योगिक वसाहतीमधील पिगमेंट तयार करणार्‍या लोना इंडस्ट्रीज, सुदर्शन केमिकल, मल्लक स्पेशालिटी, मनीराम ऑर्गेनिक, सिद्धार्थ कलरकेम या पाच कंपन्यांच्या व्यवस्थापकांना तातडीने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या महाड येथील कार्यालयात पाचारण केले. या कंपन्यांमध्ये होणार्‍या उत्पादनाबाबत दासगाव येथे टाकलेल्या घनकचर्‍याबाबत शहानिशी केले. मात्र यामधील पाचही कारखानदारांनी हा कचरा आपला नसल्याचे सांगितले.

टाकण्यात आलेल्या घनकचर्‍याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पाच कंपन्यांच्या व्यवस्थापकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. – इंदिरा गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड.

Exit mobile version