दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

अँटी करप्शन बोर्डकडून कर्जतच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याचा गौरव वाढवणारी अभिमानास्पद घटना घडली असून, कर्जत तालुक्यातील अँटी करप्शन बोर्डच्या पदाधिकाऱ्यांचा थेट देशाची राजधानी दिल्लीमध्ये भव्य सन्मान करण्यात आला. विविध राज्यांतील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात रायगडच्या सुपुत्रांनी आपली छाप पाडली.

कर्जत तालुक्यातील अँटी करप्शन बोर्डच्या तीन पदाधिकाऱ्यांचा दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला. रविवार, दि. 12 एप्रिल रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानित करण्यात आले.

अँटी करप्शन बोर्डचे नॅशनल प्रेसिडेंट आर.के. जैन तसेच अँटी करप्शन वुमन सेलच्या नॅशनल प्रेसिडेंट ज्योती जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब खैरनार यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील भरत पांडुरंग राणे यांना ‌‘भारत की शान’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच रामदास जनार्दन माळी आणि काशिनाथ धुळे यांना ‌‘ऍक्टिव्ह मेंबर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या सन्मानामुळे कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सोहळ्यात अँटी करप्शन बोर्ड, के लाईन टाइम्स आणि युनिटी ऑफ प्रेस अँड मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांतील प्रतिनिधींनी या सोहळ्यास हजेरी लावली. एकूण 52 पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यापैकी 21 पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांना मिळाले. ‌‘भारत की शान’, ‌‘बेस्ट लीडरशिप’, ‌‘ॲक्टिव्ह मेंबर’ तसेच ‌‘हॉनरी डॉक्टरेट’ अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. रायगड जिल्ह्यातील या पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version