शिंदे व पवारांचा लवकरच राजकीय अस्त

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांचे भाकीत

। कोलकता । वृत्तसंस्था ।

ज्या पक्षाने व नेत्यांनी मोठे केले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकविणार असून 2025 मध्ये या दोन्ही नेत्यांचा राजकीय अस्त झालेला पाहायला मिळेल, असे धक्कादायक भाकीत तृणमूल काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता व राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केले.

राज्यसभेत आक्रमकपणे मोदी सरकारवर हल्लाबोल डेरेक ओब्रायन यांनी अनेकदा केला आहे. तृणमूल काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी येथील तृणमूल भवनात संवाद साधला. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात भाजपने ‘मोदी की गॅरंटी’ म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यावेळीही ते म्हणाले मोदी की गॅरंटी. आता मतदानाचे तीन टप्पे संपल्यानंतर भाजपचे नेते आता ही गॅरंटी विसरले. आता भाषणांमध्ये मोदी की गॅरंटी नाही व अब की बार 400 पार ही घोषणाही गायब झाली आहे. त्यामुळे या तीन टप्प्यात त्यांची स्थिती किती दयनीय झाली आहे, याची कल्पना येईल, असे डेरेक ओब्रायन म्हणाले.

पश्‍चिम बंगालच्या 2021 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला 200 जागा मिळतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात 70 जागा मिळाल्या. अमित शहांनी दावा केलेल्या जागांपैकी केवळ एक तृतीयांश जागा भाजपला मिळाल्या होता. या निवडणुकीत 35 म्हणत आहेत. आता 35 चे एकतृतीयांश किती होतात, याची आकडेमोड तुम्ही करून घ्या. संदेशखालीच्या मुद्यावरून भाजप रंगेहाथ पकडली गेली आहे. तुम्ही स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ पहा. सर्व काही अगदी सुस्पष्ट झाले आहे. ही सर्व घटना विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात घडवून आणलेली आहे. हा केवळ महिलांचा अपमान नाही तर पश्‍चिम बंगालच्या लोकांचाही अपमान आहे. याचा फटका भाजपला बशिरहाटच्या मतदानातून दिसून येईल. मतदारच त्यांना धडा शिकवतील. ही जागा आम्ही दोन लाखांच्या मताधिक्यांनी जिंकू.असे डेरेक ओब्रायन म्हणाले.

केंद्र सरकारच्या अनेक योजनांपेक्षा चांगल्या योजना आधीपासूनच पश्‍चिम बंगालमध्ये सुरू आहेत. तुम्ही आयुष्मान योजनेची गोष्ट करीत असाल. ही योजना लागू होण्यापूर्वी दोन वर्षांपासून पश्‍चिम बंगालमध्ये स्वास्थ साथी योजना सुरू आहे. या योजनेतून आम्ही अडीच कोटींपेक्षा अधिक लोकांना फायदा दिला आहे. उलट मनरेगा व आवास योजनेसाठी एका पैशाचा निधी केंद्राने पश्‍चिम बंगालला दिला नाही. आपण संघराज्य संरचना स्वीकारली आहे. त्यांना एक राष्ट्र, एक राज्य, एक निवडणूक, एक भोजन हवे आहे. या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढतो. भारताची विविधता जपण्यासाठी आम्ही लढत आहोत. उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोन्ही नेते भाजपला जबर धक्का देणार आहेत. मी पुन्हा एक महत्त्वपूर्ण भाकीत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे 2025 पूर्वी संपूर्णपणे संपलेले नेते असतील. या दोन्ही नेत्यांचा राजकीय अस्त होईल. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घुसलेल्या या नेत्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकविणार आहे. मी महाराष्ट्रावर प्रेम करणारा माणूस आहे. अनेक वर्षे मी महाराष्ट्रात काम केले आहे.

Exit mobile version