दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’

न्युझीलंडची अंतिम सामन्यात धडक

| कोलकाता | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकातील पहिला उपांत्य फेरीचा सामना बुधवारी (दि.4) दक्षिण अफ्रिका व न्यूझीलंड यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडला. यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ असलेला आफ्रिकेचा संघ मोक्याच्या सामन्यात पुन्हा एकदा चोकर्स ठरला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभूत केला असून टी-20 विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा आफ्रिकेवरील पहिलाच विजय ठरला आहे. यापूर्वी पाच सामन्यांत आफ्रिकेने बाजी मारली होती. परंतु, आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या इतिहासात न्यूझीलंडने आफ्रिकेला नेहमी पराभूत केले आहे. तिच परंपरा कायम राखताना न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला.

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण अफ्रिकेला पहिली फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. यावेळी आफ्रिकेचे सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्याच षटकात सलग 2 चेंडूंवर क्विंटन डी कॉक (10) व रायन रिकेल्टन (0) स्वस्त्यात बाद झाले. त्यानंतर मार्करम (18) झेलबाद झाला. लगेच डेव्हिड मिलरही (6) बाद झाला. यादरम्यान किवींकडून दोन झेल सुटले; परंतु, त्याचा फार मोठा फटका त्यांना बसला नाही. आफ्रिकेचे अवघ्या 77 धावांवर 5 फलंदाज माघारी परतले होते. मात्र, त्रिस्तान स्तब्स व मार्को यान्सेन या जोडीने धुमाकुळ घातला. त्यांनी सहाव्या बळीसाठी 78 धावा जोडल्या. तत्पूर्वी डेवॉल्ड ब्रेव्हिसने 34 धावांची खेळी केली होती. त्यानंतर स्टब्स्‌‍ 29 धावांवर माघारी परतला अन्‌‍‍ पुन्हा न्यूझीलंडने पुनरागमन केले. यावेळी यान्सेनने 30 चेंडूंत 55 धावांची नाबाद खेळी केली. टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीतील हे त्याचे पाचवे आणि आफ्रिकेकडून दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. यान्सेनच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेला 8 बाद 169 धावांपर्यंत मजल मारता आली. किवींकडून कोल मॅकोंची, मॅट हेन्री व रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर, ल्युकी फर्ग्युसन आणि जिमी निर्शम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले फिन ॲलन व टीम सेइफर्ट या सलामिवीरांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरूवात करून दिली. त्यांनी 4.1 षटकांत 50 धावा फलकावर चढवल्या. त्यानंतर या जोडीने 7.5 षटकांत 100 धावा फलकावर चढवल्या. सेइफर्टने 28 चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले. परंतु, 117 धावांवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. सेइफर्ट 33 चेंडूंत 58 धावांवर कागिसो रबाडाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. मात्र, ॲलन मैदानावर उभा राहिला आणि त्याने संघाला 12.5 व्या षटकांत विजय मिळवून दिला. ॲलनने 33 चेंडूंत 100 धावांची नाबाद खेळी केली. रचिन रविंद्र 13 धावांवर नाबाद राहिला. त्यामळे न्यूझीलंडने 9 गडी राखून दक्षिण अफ्रिकेवर सहज विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

फिन ॲलेनची विश्वविक्रमांना गवसणी
न्यूझीलंडच्या विजयात टीम सिफर्ट आणि फिन ॲलेन यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांनी 117 धावांनी सलामी भागीदारी केली. फिन ॲलेनने तर अफलातून फटकेबाजी करताना अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावत अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. त्याने युवराज सिंगचा 19 वर्षे जुना विक्रमही मोडला. शतक झळकवण्याआधी ॲलेनने 19 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर पुढच्या 14 चेंडूत त्याने त्याचे शतक पूर्ण केले. त्यामुळे ॲलेन आता टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. युवराज सिंगने 2007 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बनला झालेल्या उपांत्य सामन्यात 20 चेंडूत अर्धशतक केले होते. तसेच, ॲलेन टी-20 विश्वचषकाच्याा बाद फेरीत शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याचसोबत तो सर्वात जलद शतक करणारा खेळाडू देखील ठरला आहे.
Exit mobile version