बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांची कोंडी; सभागृहात राजकीय संघर्षाची ठिणगी
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगरपालिका सभागृहात शांततेतपार पडली असली, तरी सभागृहात राजकीय संघर्षाची ठिणगी जोरदार पेटल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना अक्षरशः कोंडीत पकडत नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाचे ठराव नामंजूर केले आहेत. परिणामी, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित कामे पुन्हा एकदा राजकारणाच्या बळी पडल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. मात्र, भाजपाकडे 12 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने सभागृहातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा दबदबा कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सत्तेची सूत्रे एका बाजूला आणि बहुमताची ताकद दुसऱ्या बाजूला, अशा विसंगतीत नगरपरिषद अडकली असल्याचे चित्र स्पष्ट झाले. नुकत्याच पार पडलेल्या सभेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या कामांसाठी ठराव मांडण्यात आले होते. त्यात पाणीपुरवठा टाक्यांची स्वच्छता, बोरी गावातील रस्त्यांची दुरुस्ती, मुख्य नाल्यालगत सुरक्षा भिंत, स्मशानभूमी सुशोभीकरण, गटार दुरुस्ती, अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसविणे इत्यादी नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित कामांचा ठराव मांडण्यात आला होता. परंतु, विरोधकांनी निधीअभावाचे कारण देत त्यात अडथळा आणला. प्रत्येक ठरावावर मतदान घेतले असता 10 विरुद्ध 12 अशा फरकाने ठराव नामंजूर करण्यात आले. यावेळी नगरसेवक अतुल ठाकूर, प्रमिला पवार आणि स्वीकृत सदस्य गणेश शिंदे यांनी विकासकामांसाठी प्रयत्न केले; परंतु, विरोधकांच्या एकजुटीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
पावसाळा तोंडावर आला असताना अशा कामांना ब्रेक लावल्यामुळे शहरात पूरस्थिती, अस्वच्छता आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तरीही राजकारणाच्या नादात नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे डोळेझाक केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत ज्या प्रभागात विकासकामे गेली अनेक वर्षे रखडली आहेत, ती करण्यास विद्यमान नगरसेवक बहुमताच्या जोरावर निधी नसल्याचे कारण पुढे करून विरोध करीत आहेत. मात्र, त्या विभागातील स्थानिक जनता मूकपणे गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अन्यायाविरोधात जनतेने रस्त्यावर उतरणे आवश्यक बनले असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीही विरोधकांवर सडकून टीका करताना, राजकारण वेगळे आणि नागरिकांचे प्रश्न वेगळे असतात. पावसाळ्यापूर्वीची कामे थांबवणे म्हणजे जनतेशी अन्याय आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. एकंदरीत, उरण नगरपरिषदेत ‘सत्तेचा खेळ’ सुरू असताना विकास मात्र कोलमडल्याचे चित्र समोर येत आहे. बहुमताचा वापर करून ठराव पाडले जात असतील, तर हे लोकशाहीचे लक्षण की विकासाचा गळा घोटण्याचा प्रयत्न? असा थेट सवाल उरणकरांकडून विचारला जात आहे.






