| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘क’ कामोठे अंतर्गत आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने नुकतीच विविध ठिकाणी अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या तसेच जाहिरात टेम्पो यांच्यावर विशेष कारवाई करण्यात आली.
कामोठे विभागातील मानसरोवर रोड, खांदेश्वर रेल्वे स्टेशन रोड, गणपती मंदिर परिसर, सेक्टर 18 नीलकंठ स्वीट परिसर, ॲक्सिस बँक समोरील परिसर, मोठा खांदा हायवे जवळील सेक्टर 22 तसेच कजरी समोरील फुटपाथ परिसरात ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मा. सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रुपाली माने यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या कारवाईदरम्यान फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या, टेम्पो तसेच विविध साहित्य जप्त करण्यात आले. नीलकंठ चौक येथून आईस्क्रीम व केएफसीची हातगाडी जप्त करण्यात आली. ही गाडी तसेच 1 हातगाडी व 1 अनधिकृत जाहिरात टेम्पो जप्त करून सुवर्णदुर्ग कार्यालय, कामोठे येथे जमा करण्यात आले.
अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण 18 सिलेंडर, 18 हातगाड्या, 15 आईस्क्रीम गाड्या, 1 जाहिरात टेम्पो, 2 शिलाई मशीन, 17 खुर्च्या, 3 टेबल, 1 वजन काटा, 2 तवे, 1 चायनीज काउंटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. अनधिकृतरीत्या आंबे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई करून त्यांच्या गाड्या व आंब्याच्या पाट्या जप्त करण्यात आल्या.
सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत व्यवसायांवर पुढील काळातही नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागामार्फत अधिक्षक दशरथ भंडारी यांनी दिली आहे. प्रभाग समिती क कामोठे मध्ये सोमवार ते बुधवार व गुरुवार लागणाऱ्या आठवडे बाजारांवर अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करून हे बाजार बंद केले आहेत.
कामोठेत अतिक्रमणांवर विशेष कारवाई
