आरोग्य विभाग स्तूत्य उपक्रम राबविणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांसाठी आरोग्य विभागामार्फत विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रसुतीची तारीख जवळ आलेल्या गर्भवती मातांना आठ दिवस अगोदरच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाणार आहे. त्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोयी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाचा हंगाम सुरु होण्याच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात 132 अधिक पुरग्रस्त गावांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे या गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण होते. महाडसह रोहा, अशा अनेक तालुक्यातील गावांमध्ये पावसाळ्यात पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुराच्यावेळेला अनेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका कायमच असतो. रुग्णांसह गरोदर मातांना दवाखान्यात पोहचविणे कठीण होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊल उचलले आहे. पूरग्रस्त भागातील ज्या महिलांची प्रसुतीची तारीख जवळ आली असेल, त्या गर्भवती महिलांना आठ दिवस अगोदरच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाणार आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने नियोजन केले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
