| अलिबाग | प्रतिनिधी |
अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या जीवनदूतांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरत गोगावले यांनी केले. रायगड पोलीस आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळ्याचे आयोजन अलिबाग तालुक्यातील आर.सी.एफ. वसाहतीतील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हेल्प फाऊंडेशन, शेलार मामा रेस्क्यू, संघर्ष एक समाज सेवेसाठी, फ्लाइंग बर्ड्स श्रीवर्धन, पोलादपूरचे सह्याद्री वन्यजीव पथक, एलअँडटी कन्स्ट्रक्शन रेस्क्यू टीम, नेरळ-माथेरान रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू, महाबळेश्वर ट्रेकर्स, महाड परिसरातील रेस्क्यू पथक तसेच जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास नागोठणे येथील रिलायन्स फाऊंडेशनच्या सीएसआर निधीतून बचाव नौका आणि बचाव साहित्य किट सुपूर्द करण्यात आला.
‘जीवन’दूतांचा विशेष सन्मान
