| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महर्षि विनोद सिध्दाश्रम सेवा मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच 1926 मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांमध्ये वेणू अभ्यंकर उर्फ मैत्रेयी धुंडीराज विनोद यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या अभुतपूर्व अनन्यसाधारण यशाची शतकपूर्ती कार्यक्रमदेखील होणार आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील सिध्दाश्रम येथे हा कार्यक्रम रविवारी (दि. 8) सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते असणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत समारंभ महर्षी विनोद सिध्दाश्रम सेवा मंडळ प्रमुख विश्वस्त ॲड. अदिती वैद्य करणार आहेत.
आधुनिक भारतातील अधिकारी वर्गाने कसे राज्य चालवावे या विषयावर तामिळनाडू-मद्रासमधील सेवानिवृत्त आयएस अधिकारी, लता पडळकर (परांजपे) यांचे व्याख्यान असणार आहे. न्याय व्यवस्थेतील अनुभव या विषयावर निवृत्त जिल्हा न्यायाधीश सविता बारणे, मार्गदर्शन करणार आहेत. महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर अलिबागमधील वरदा पटवर्धन तसेच स्त्री विषयक कायद्याचा वापर किंवा गैरवापर या विषयावर ॲड. जीविता पाटील यांचे व्याख्यान असणार आहे. तसेच डिजीटल युगातील वकील या विषयावर ॲड. सई वैद्य मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा
