कलंबोलीमध्ये बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना भरधाव टेम्पोची धडक; दोघांचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

कळंबोली येथे भरधाव टेम्पोने खासगी ट्रॅव्हल्स बसमधून उतरून सामान काढत असलेल्या दाम्पत्यासह बसच्या क्लिनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संगीता मोटे आणि बस क्लिनर बाळू सरताते यांचा मृत्यू झाला, तर संगीता यांचे पती पोपट मोटे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोपट मोटे (50) हे कळंबोली सेक्टर-1 ई मधील एलआयजी वसाहतीत कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वी ते पत्नी संगीता यांच्यासह सातारा जिल्ह्यातील म्हसवड या मूळ गावी गेले होते. माणदेश ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने ते कळंबोलीकडे परतत होते. कळंबोली सर्कलच्या पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीएनजी पंपाजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी मोटे दाम्पत्य आणि बसचा क्लिनर बाळू सरताते सामान काढण्यासाठी खाली उतरले होते.

बस आणि फुटपाथ यांच्यामधील जागेत सामान काढत असताना कळंबोली सर्कलकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव टेम्पो थेट बस आणि फुटपाथमधील जागेत घुसल्याने तिघांना जोरदार धडक बसली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संगीता मोटे आणि बाळू सरताते यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. गंभीर जखमी पोपट मोटे यांना पुढील उपचारासाठी सुश्रुत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी टेम्पो चालक इफतेखार अहमद अब्दुल रेहमान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version