सुरेखा बिराजदार प्रथम, वैशाली मलबारी द्वितीय क्रमांकाच्या मानकरी
| पेण | प्रतिनिधी |
गणरायाच्या आगमनाने घराघरांत दरवळणारा उकडीच्या मोदकांचा सुगंध आणि महिलांच्या पाककलेतील सर्जनशीलतेचा सुरेख मिलाफ पेणमध्ये अनुभवायला मिळाला. महिलांच्या पाककला कौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ पेणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उकडीचे मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सुरेखा बिराजदार यांनी प्रथम, तर वैशाली मलबारी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून पनवेलच्या प्रसिद्ध पाककला तज्ज्ञ संध्या कल्याणकर यांनी काम पाहिले. मोदक व पुरणपोळी बनविण्यात विशेष प्रावीण्य असलेल्या कल्याणकर यांनी स्पर्धकांना उकडीचे मोदक बनविताना घ्यावयाची काळजी, उकडीची योग्य पद्धत, सारणाची चव आणि मोदकाच्या कलात्मक बांधणीबाबत उपयुक्त टिप्स देत मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धेत सुरेखा बिराजदार यांनी प्रथम, वैशाली मलबारी यांनी द्वितीय, तर मयुरी गोडीवले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पूनम पाटील, अर्चना पाटील आणि शीतल खाडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन त्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेविका पल्लवी प्रसाद कालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धक महिलांचे कौतुक करून त्यांच्या पाककला कौशल्याला शुभेच्छा दिल्या.
महिलांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी इनरव्हील क्लबतर्फे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, असे क्लबच्या अध्यक्षा संयोगिता टेमघरे यांनी सांगितले. कार्यक्रमाला रुची महालकर, सोनाली पाटील, सुषमा तेलंगे, नीलिमा पाटील, भावना पगारे, दीपिका शिगवण, प्रियांका राजे, प्रियांकि मुखर्जी आणि आलीना सय्यद यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती. सर्व सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि काटेकोर नियोजनामुळे कार्यक्रमाला उत्सवी वातावरण प्राप्त झाले.






