| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सिध्देश्वरी कॉर्नर येथील दिवा अँटिलिया येथे डॉ. प्रतिभा देवेंद्र महिंद्रकर यांच्या श्री साई क्लिनिक दवाखान्यात परिसरातील रूग्णांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, अस्थीरोग तपासणी, रक्तातील साखर पातळी तपासणी, बी.एम.डी. हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, त्वचेचे आजार व जनरल तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात 121 नागरिकांनी मोफत तपासणी करुन तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले. यावेळी आजार असणार्या रुग्णांवर मोफत उपचार व मार्गदर्शन श्री साई क्लिनिकतर्फे करण्यात आले. या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्योजक विजय मुरकुटे व रसायनी पोलीस ठाण्याचे सपोनि माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची या आरोग्य शिबिरास उपस्थिती लाभली होती. त्यांचे स्वागत डॉ. देवेंद्र महिंद्रकर व डॉ. प्रतिभा महिंद्रकर यांनी केले.