| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी (दि.16) रायगड जिल्ह्यातील चार केंद्रामध्ये मतदान झाले. या मतदानाला मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून मतदारांनी केंद्रावर मतदानासाठी रांग लावली होती. त्यामुळे एक वेगळा उत्साह मतदारांमध्ये दिसून आला. तरुणांसह वयोवृध्द, दिव्यांग मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला. दुपारपर्यंत 78 टक्के मतदान झाले असून मोजणी रविवारी (दि.17) सकाळी नऊ वाजता जेएसएम महाविद्यालयात होणार आहे.
रायगड जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आजपर्यंत बँकेमार्फत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आदींसह लहान मोठ्या व्यवसायिकांना उभारी देण्याचे काम जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांनी केले. त्यामुळे 21 जागांपैकी 18 जागांवर बिनविरोध शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकत राहिला. उरलेल्या तीन जागांसाठीचे मतदान शनिवारी घेण्यात आले.
अलिबागमध्ये नगरपरिषदेची उर्दू शाळा, पेणमधील सार्वजनिक विद्यालय, माणगावमधील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, खालापूरमधील प्रभाकर पाटील शिक्षण संस्थेचे गंगाविष्णू जखोटीया मेमोरिअल इंग्रजी माध्यम शाळा या चार मतदानकेंद्रात सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरु झाले. अलिबासह अनेक मतदान केंद्रात सकाळपासूनच मतदान करण्यास मतदारांनी सुरुवात केली. स्वयंस्फुर्तीने मतदार मतदान करण्यासाठी केंद्राच्या दिशेने वळले होते. एक वेगळा उत्साह प्रत्येक मतदारांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
सकाळी दहा वाजेपर्यंत 41 टक्के मतदान झाले. त्यात दोनशेपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बारावाजेपर्यंत 78 टक्के मतदा झाले. त्यामध्ये सुमारेस 550 पेक्षा अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे.
दोनशेहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी अलिबागसह, खालापूर, माणगाव, व पेण मतदान केंद्रामध्ये मतदान झाले. शेकापचे आ. जयंत पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जि. प. माजी सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, प्रदीप नाईक, द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, बाळू पाटील, पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर आदींनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदारांकडून प्रतिसाद मिळाला. मतदान केंद्रासमोर मतदारांची रांग लागली असल्याचे दिसून आले.