जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
| कोर्लई | वार्ताहर |
रायगड जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या अलिबागमधील क्रीडाभुवन मैदान पुन्हा एकदा बेकायदा अतिक्रमणातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व तहसीलदार यांजकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक अलिबागप्रेमी, मैदानप्रेमी, सामाजिक कार्यकर्ता नात्याने अलिबाग शहरातील एकमेव क्रीडांगण जे क्रीडाभुवन या नावाने ओळखले जाते, राजकीय व्यक्तींच्या बेकायदा ताब्यातून आहे व ते बाहेर काढण्यासाठी मी 2014 मध्ये अपील दाखल केली आहे. त्याचा पहिला परिणाम म्हणून सर्व मैदान आता जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आले आहे. खेळाच्या या एकमेव मैदानावर वारंवार बेकायदा अतिक्रमणे होत असतात. उदा. पार्किंग बेकायदा टपऱ्या, हातगाड्या, स्टॉल्स लावले जातात. याचा क्रीडाप्रेमींना त्रास होतो. प्रसंगी भांडणे होतात. या बेकायदा गोष्टींविरोधात सतत तक्रारी करण्यात आल्या आहेत, पण महसूल खाते, तहसीलदार व अन्य इकडे स्वतःहून काहीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप दिलीप जोग यांनी केला आहे.
आता पावसाळा संपला आहे. क्रीडाप्रेमींना खेळ सुरु करायचे आहेत. परंतु, पुन्हा जोरात बेकायदा टपऱ्या हातगाड्या पार्किंग सुरु झाले आहे. आपण त्याची त्वरित दखल न घेतल्याने मला परत परत तक्रार करावी लागत आहे. आपण कठोर उपाययोजना करावी अन्यथा याविरोधात दि.20 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिलीप जोग यांनी दिला आहे.