स्पोर्टी-गो कळंबोली संघाचा सलग दुसरा विजय

| क्रीडा | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद चवरकर स्मृतीचषक 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघाने लागोपाठ दुसरा विजय मिळवला आहे. फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाचा 57 धावांनी पराभव करत साखळी फेरीत गटामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत स्पोर्टी-गो संघाने 40 षटकांमध्ये 209 धावा केल्या. सलामीला आलेल्या श्रेयस खिल्लारे याने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. त्याला अर्णव मिरगे 24, निवेध लखवानीने 20 धावा काढून साथ दिली. माणगाव संघाकडून पार्थ मस्केने चार, तर अजय जाधवने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.

प्रत्युत्तरात माणगाव संघाचा डाव 40 षटकांमध्ये 154 धावसंख्येवर संपुष्टात आला. अजय जाधवने तडाखेबंद फलंदाजी करून 54 धावा ठोकत सामन्याला रंगत आणली.स्पोर्टी-गो संघाकडून रुद्र खानावकारने सुरेख गोलंदाजी करत तीन बळी घेतले. तर, दुसऱ्या बाजूने अबीर पराशर 2, जयंद्र पावसकर, अमोघ कदम, श्रेयस खिल्लारे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अष्टपैलू खेळ करणाऱ्या श्रेयस खिल्लारेला सामनावीर, अजय जाधव स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, पार्थ मस्के, निर्भय राणे यांना परमेश्वर जाधव, रोहित काळे, किशोर गोसावी, मंगेश कदम, नरेंद्र पावसकर, गौरव कदम, हेमलता सामंत, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version