निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी
| पनवेल | राजेश डांगळे |
सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 9 मधील रहिवाशांच्या पुढाकारातून सुमारे 1 हेक्टर क्षेत्रफळात ॲग्रो गार्डनची निमिर्ती करण्यात आली आहे. अतिउच्च दाबाच्या वीजतारांखालील मोकळ्या जागेचे रूपांतर भाज्या, फळझाडे, फुलपाखरांसाठी उपयुक्त फुलझाडे आणि वनौषधींनी नटलेल्या हिरव्या बागेत करण्यात आले आहे. नुकताच या गार्डनमध्ये यंदाचा ‘वसंतोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी ठरत आहे.
या कार्यक्रमाला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. निसर्गपूरक वस्तूंचे स्टॉल्स, स्थानिक उद्योजकांनी उभारलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मातीच्या वस्तू बनवण्याच्या कार्यशाळा, निसर्ग छायाचित्रण, अनवट नृत्यप्रकार, भरतकाम, तसेच मोकळ्या गवतात बसून चित्रकलेचे उपक्रम यामुळे वातावरण रंगले होते. अर्बन स्केचर्स संस्थेने परिसराचे निरीक्षण करून निसर्गचित्रे साकारली. वृक्ष व निसर्ग वाचनासाठी विशेष फेरफटका आयोजित करण्यात आला होता. प्रवेशद्वारावर उभारलेल्या आकर्षक बांबूच्या कमानींमुळे उत्सवस्थळाची शोभा अधिक खुलून दिसत होती. संध्याकाळी ॲग्रो गार्डनमधील ‘तारांगण’ या खुल्या रंगमंचावर लहान मुलांनी ड्रम वादन सादर केले. तर, गुणी गायकांनी सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली. वन्यवाणी संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘ए बिबट’ या भारुडातून लोकजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. त्यानंतर नवी मुंबई ड्रम सर्कलच्या जोशपूर्ण वादनावर उपस्थितांनी ताल धरत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. सामूहिक सहभाग, निसर्गाविषयीची जाणीव आणि सांस्कृतिक रंगत यांचा संगम साधत यंदाच्या वसंतोत्सवाची उत्साहात आणि यशस्वी सांगता झाली.
