नवी मुंबईत स्पुतनिक-व्ही लस दाखल

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लसीकरणास सुरुवात
नवी मुंबई | वार्ताहर |
रशियन बनावटीची आणि एकच डोस पुरेसा असेली स्पुतनिक व्ही लस कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी आता नवी मुंबईत उपलब्ध झाली आहे. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर इथे गुरुवारी 75 नागरिकांना ही लस देण्यात आली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सानपाडा येथे राहणार्‍या फायना फिलिप या तरुणीला ही लस देऊन या लसीकरणाला सुरुवात झाली. स्पुतनिक व्ही लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर नोंद करणे गरजेचे आहे, तसेच 9619454545 या नंबरवर फोन करून नाव नोंदवू शकता. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे हे लसीकरण सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे भाकीत अनेक आरोग्य संघटना करीत असून, स्पुतनिक व्ही या लसीकडे आपण मोठ्या आशेने पाहात आहोत. भारतात रशियाची स्पुतनिक व्ही कोरोना लसीचे उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करीत असून, या लसीची किंमत 1145/- आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लसीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लसीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लसीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत. चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्ससुद्धा झाले नाहीत, असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’मधील अहवालात केला आहे.

दोन बिलियन डोस हे पुढील पाच महिन्यांमध्ये भारताला उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. 11 ऑगस्ट 2020 रोजी रशियाने या लसीची नोंदणी केली होती. म्हणजेच, कोरोना विरोधातली जगभरातली ही पहिली लस आहे.

Exit mobile version