। मलप्पूरम । वृत्तसंस्था ।
मेट्रोमॅन अशी ओळख निर्माण करणारे ई. श्रीधरन केरळ विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने त्याची देशभर चर्चा झाली होती. या निवडणुकीत त्यांच्या पदरी अपयश पडले होते. त्यानंतर श्रीधरन फारसे सक्रिय नव्हते. अखेर श्रीधरन यांनी आता मोठा निर्णय घेतला असून राजकारणाला कायमचा रामराम ठोकला आहे. राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणाच आज श्रीधरन यांनी करून टाकली. त्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत मेट्रोमॅन श्रीधरन यांना पलक्कड मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती. श्रीधरन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली होती. मात्र, या निवडणुकीत श्रीधरन यांना पराभवाचा धक्का बसला होता. श्रीधरन यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवार पराभूत झाले होते. राज्यात केवळ एक जागा भाजपला जिंकता आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीला दहा महिने उलटल्यानंतर आता श्रीधरन यांनी मोठे पाऊल उचलले आहे.श्रीधरन यांचं वय आता 90 वर्षे आहे. निवडणुकीतील पराभवाची सल त्यांना बोचत आहे. त्यातूनच त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.