श्रीवर्धनला अतिवृष्टीचा फटका; जनजीवन विस्कळीत

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यात मंगळवारपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. बोर्लीपंचतन-म्हसळा तसेच श्रीवर्धन-बोर्लीपंचतनकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाणी वाढल्याने गुरुवारी दिवसभर वाहने अडकून पडली होती. तर या अतिवृष्टीमुळे स्थानिक शाळा व्यवस्थेने बोर्लीपंचतन परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली.

तीन दिवस अतिवृष्टीने श्रीवर्धनमधील शिस्ते, कापोली, खुजारे, आरावी या गावांच्या नद्यांनी पातळी इशारा ओलांडल्याने अनेक मुख्य रस्त्यावर पाणी आले व या गावांना नद्यांनी पुराचा वेढा दिला. दिवसभरात कोठे मोठे नुकसान झाल्याची नोंद नव्हती. मात्र, या पावसात सर्वत्र पाणी तुंबण्याची अवस्था पाहायला मिळाली. श्रीवर्धनमध्ये मागील गुरुवारी 55 मिलिमीटर सर्वात कमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी 166 मिमी पाऊस पडला असून, आजपर्यंत 1955 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरील पाणी ओसरले नसून अद्याप पूरसदृश्य परिस्थिती तशीच आहे.

Exit mobile version