मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास एसटी प्रशासनाकडून टाळाटाळ

| तळा | प्रतिनिधी |

तारणे येथे मे महिन्यात झालेल्या एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास एसटी प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असून, याबाबत मृतांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे येथील एका धोकादायक वळणावर 8 मे रोजी रहाटाड येथून तळा येथे येणारी रोहा डेपोची एसटी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्यात जोरदार धडक होऊन दुपारी एकच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. या अपघातात तृप्ती विजय खुटीकर (22) राहणार रहाटाड कोळीवाडा, लक्ष्मण ढेबे (36) राहणार धनगर वाडी, अनन्या गवाणे (7) राहणार आंबेत, विठ्ठल कजबजे (55) राहणार खांबवली या चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अविनाश वजरे राहणार पालघर या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेला चार महिन्यांचा कालावधी लोटूनही मृतांच्या नातेवाईकांना एसटी प्रशासनाकडून अर्थिक मदत देण्यात आलेली नाही. मृतांच्या नातेवाईकांनी पी.फॉर्म भरून एसटी प्रशासनाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे.

त्यानुसार एसटीच्या अधिकाऱ्यांकडून ऑडिट देखील करण्यात आले असून, आर्थिक मदतीशिवाय इतर कोणतीही मागणी नाही असे मृतांच्या नातेवाईकांकडून सत्यप्रत घेण्यात आले आहे. मात्र, आर्थिक मदतीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी पाठपुरावा केला असता सुरुवातीला गणपतीच्या ड्युट्या आहेत, ऑडिट बाकी आहे, ऑडिट करणाऱ्या मॅडमचा अपघात झाला आहे. तुमचा ऑडिट पूर्ण झाला आहे. पैसे अकाउंटला जमा होणार आहेत. तुम्ही केस दाखल केली असल्याने आम्ही पुढे पत्रव्यवहार करून मार्गदर्शन घेणार आहोत. अशी टाळाटाळीची उत्तरे देण्यात आली. अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना या आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

तारणे येथील एसटी अपघातात माझी बहीण मृत्युमुखी पडली. त्यावेळी जाहीर केलेली मदत चार महिने उलटूनही मिळालेली नाही. एसटी प्रशासनाकडून दरवेळी टाळाटाळीची उत्तरे दिली जात आहेत.

अविनाश खुटीकर,
नातेवाईक

Exit mobile version