एसटीचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. राजापूर एसटी डेपोत कार्यरत असणाऱ्या चालकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अनिल शिवाजी दिवसे (41) असे एसटीचालकाचे नाव असून आठ महिन्यांपूर्वीच राजापूर एसटी डेपोमध्ये चालक या पदावर रुजू झाले होते.

अनिल दिवसे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नागदेवाडी येथील असून आठ महिन्यांपूर्वीच राजापूर एसटी डेपोमध्ये चालक या पदावर रुजू झाले होते. अनिल हे मंगळवारी (दि. 27) राजापूर एसटी आगाराची कुंभवडे वस्तीची गाडी घेऊन गेले होते. कुंभवडे ग्रामपंचायत कार्यालयाच्याशेजारी एका रूममध्ये चालक-वाहकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास जेवणाची वेळ झाली म्हणून त्यांच्यासोबत असलेले वाहक मनगुडे यांनी त्यांना फोन केला; मात्र, त्यांचा फोन व्यस्त लागत होता. त्यानंतर पुन्हा साडेदहाच्या सुमारास फोन लावला असता फोन दरवाजाजवळच वाजत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहक बाहेर बघायला गेले. तेव्हा ते बाहेरच्या बाजूला लोखंडी खिडकीच्या ग्रीलला स्व:ताच्या रुमालाची गाठ बांधून गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले.

याबाबत वाहक मनगुडे यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठांना कळवले. त्यांच्या वरिष्ठांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. आत्महत्येचे कारण अद्याप समझू शकले नाही. मात्र, याबाबत अधिक तपास राजापूर नाटे पोलीस करत आहेत.

Exit mobile version