| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) 78 वा वर्धापन दिन सोमवारी (दि. 1) अलिबाग एसटी बस आगारात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून या विशेष दिवसाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांचा सन्मानही करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त अलिबाग एसटी बस आगार आणि बस स्थानक परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. तसेच ‘संबोधी’ नावाच्या एसटी बसला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. बसची विधिवत पूजा करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आगार परिसरात विविध ठिकाणी फुलांच्या माळा लावून सुशोभीकरण करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरलेल्या केक कापण्याचा सोहळा ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिलांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी एसटीतील वाहतूक निरीक्षक, कार्यशाळा विभागातील अधिकारी व कर्मचारी, चालक, वाहक तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एसटीच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटीने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यात एसटीचे योगदान मोलाचे राहिले आहे. या सेवेमध्ये अधिकारी, चालक, वाहक, मॅकेनिक आणि इतर कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक आजही मोठ्या प्रमाणावर एसटीच्या सेवांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाशी घट्ट नाते जोडलेल्या एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रवासी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांनी एसटी परिवाराला शुभेच्छा देत महामंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
अलिबागमध्ये एसटीचा वर्धापन दिन उत्साहात
