एसटी संपाने प्रवासी वार्‍यावर

कर्मचारी मागणीवर ठाम, खाजगी वाहनचालकांची मनमानी
। अलिबाग । वार्ताहर ।
एसटीचे सरकारीकरण करावे व एसटी कर्मचार्‍यांची पगारवाढ व्हावी, या मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाची झळ आता चांगलीच जाणवू लागली असून, मंगळवारी रायगडातील आठही आगारातून एकही एसटी सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सुट्टी संपवून घरी परतणार्‍या सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा भाडे आकारून खाजगी वाहनांचा आधार घेत घर गाठावे लागले. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेटच कोलमडून गेले. दरम्यान, जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार कामगार संघटनांनी केलेला आहे.
संपामुळे पेण येथील रामवाडी विभागीय कार्यालय, तसेच कार्यशाळादेखील बंद ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत शासन सर्व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच राहील असा निर्धार कर्मचारी संघटनांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केला.

अलिबाग-पनवेल 200 रूपये
एसटी संपाचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. अलिबाग ते पनवेल या मार्गावर नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना एका वेळेसाठी 200 रूपये खासगी वाहतूकदार यांना द्यावे लागत आहेत. खासगी वाहतूकदारही संपाचा पुरेपूर फायदा घेत प्रवाशांची लुट करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.


अलिबाग आगारात शुकशुकाट
नेहमी एसटीच्या वरदळीने गजबजलेले अलिबाग आगार गेल्या दोन दिवसांपासून मात्र निस्तेज झाले आहे. सर्व एसटी बसेस डेपोमध्ये बंद आहेत. त्यामुळे आगारात कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. रस्त्यावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.


एसटी संपामुळे रायगड विभागाला गेेल्या 2 दिवसात 30-35 लाखांचा तोटा झालेला आहे. सरकारच्या सुचनेनुसार खासगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतूक करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. मंगळवारी रायगडातील एकही एसटी धावली नाही.
अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक.

संपकरी कर्मचारी आगारातच
एसटी महामंडळ आणि कर्मचार्‍यांना शासनात विलनीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. अलिबाग आगारातील दोनशेहून अधिक कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी हे दोन दिवस अलिबाग आगारामध्येच आहेत.
त्यामुळे या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्रित येऊन आगारामध्येच स्वयंपाक शिजवून जेवण केले. संप मिटेपर्यत आता अलिबाग आगारातच जेवणावळी उठणार आहेत. अलिबाग आगारातील कर्मचार्‍याचा आज संपाचा दुसरा दिवस आहे. संपात असलेल्या कर्मचार्‍यांच्या खाण्या पिण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व कर्मचार्‍यांनी एकत्रित येऊन धान्य आणले. आणि स्थानकातच महिला कर्मचार्‍यांच्या मदतीने स्वयंपाक शिजवून एकत्रित जेवण केले. दोन्ही वेळेच्या जेवणाची तयारी कर्मचार्‍यांनी केली असून आता संप मिटेपर्यंत आगारामध्येच जेवणाच्या पंगती उठणार आहेत
376 कर्मचार्‍यांचं निलंबन!
महामंडळाने संपावर गेलेल्या 376 कर्मचार्‍यांना निलंबित केलं आहे. यामध्ये राज्यातील 45 आगारातील कर्मचार्‍यांचा समावेळ आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं आहे.

Exit mobile version