एसटीच्या तिकिटात 4 ते 86 रुपयांची वाढ
सामान्यांची जीवनवाहिनीचा प्रवास महागला
| रायगड | प्रमोद जाधव |
राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीचा आर्थिक भार अखेर प्रवाशांच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. सततच्या भाडेवाढीमुळे एसटी प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी स्वच्छता शुल्काच्या नावाखाली तिकीटात दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता एसटीच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत 13.56 टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अलिबागहून मुंबई, पुणे, पेण, रोहा, ठाणे, कल्याण आदी मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 4 रुपयांपासून ते 86 रुपयांपर्यंत अधिक पैसे मोजावे लागणार असून, लाखो प्रवाशांच्या, विशेषतः महिला वर्गाच्या खिशाला कात्री बसणार आहे.
मागील काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने अधिभाराच्या नावाखाली एक रुपया, त्यानंतर स्वच्छता शुल्काच्या नावाखाली दोन रुपये आकारण्यास सुरुवात केली होती. आता आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी थेट तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे. अलिबागहून पुणे, स्वारगेट, पनवेल, अक्कलकोट, पंढरपूर, सातारा, कल्याण, खोपोली, बोरीवली, ठाणे आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाडे भरावे लागणार आहे.
रायगड विभागाच्या अखत्यारीत अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, महाड, माणगाव, श्रीवर्धन आणि मुरूड अशी आठ आगारे आणि 21 हून अधिक बसस्थानके आहेत. दरमहा सुमारे दहा लाखांहून अधिक प्रवासी एसटीने प्रवास करतात. याच प्रवाशांकडून एसटीला महिन्याला सुमारे 30 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, शेतकरी आणि नियमित प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक हे एसटीचे प्रमुख आधार आहेत. मात्र, आता याच प्रवाशांवर आर्थिक भार टाकण्यात आल्याने नाराजी वाढत आहे.
‘गाव तेथे एसटी’ या संकल्पनेतून आजही दुर्गम भागात एसटी धावत असून ग्रामीण भागासाठी ती जीवनवाहिनी ठरली आहे. महिला सन्मान योजनेमुळे महिलांना 50 टक्के सवलत मिळाल्यानंतर एसटीकडे महिलांचा ओढा वाढला होता. मात्र, नव्या भाडेवाढीमुळे त्यांच्या मासिक खर्चाचे गणितही विस्कटणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आगार व्यवस्थापक फक्त नामधारी?
अलिबाग आगारातील प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याची चर्चा असून, आगार व्यवस्थापक केवळ नामधारी असल्याचे बोलले जात आहे. काही कर्मचारीच प्रत्यक्ष निर्णय घेत असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये रंगली असून, “खरा आगार व्यवस्थापक कोण?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हिरकणी कक्षाभोवती कचऱ्याचे साम्राज्य
अलिबाग बसस्थानकातील स्तनदा माता आणि नवजात बालकांसाठी उभारलेला हिरकणी कक्ष कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने महिलांकडून या सुविधेकडे पाठ फिरवली जात आहे. स्वच्छतेबाबत राज्यात तिसरा क्रमांक मिळालेल्या या बसस्थानकाची प्रत्यक्ष स्थिती मात्र पुरस्काराला साजेशी नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
