एसटी कर्मचारी संप चिघळला

न्यायालयात सोमवारी होणार सुनावणी!

मुंबई | प्रतिनिधी |
एसटी कर्मचार्‍यांचा संप आता गंभीर वळणावर येऊन ठेपला असून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर देखील संप सुरूच असल्यामुळे अखेर एसटी महामंडळाने न्यायालयात संप करणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात आणि कर्मचारी संघटनांविरोधात न्यायालय अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची आणि त्याबाबतचा शासन आदेश काढण्याची मागणी सरकारकडून मान्य होऊनही एसटी कर्मचारी संघटनांनी संप सुरू ठेवल्याच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. तसेच संप मागे घेण्याच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा वारंवार अवमान करणार्‍या संघटना किंवा कर्मचार्‍यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मुभा महामंडळाला दिली होती. समिती स्थापन करण्याबाबतचा शासन आदेश काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. तसेच ती पूर्ण झाल्यावर संप मागे घेण्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले होते. सरकारने त्यांचा शब्द पाळल्यानंतर मात्र शासन आदेश आपल्याला मान्य नसल्याचे सांगत संघटनांनी संप कायम ठेवण्याची भूमिका घेतली. संघटनांची भूमिका समजण्यापलीकडची आहे. शिवाय त्यांच्या या आडमुठया भूमिकेमुळे एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, असेही न्यायालयाने संघटनांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना नमूद केले होते.

भाजपतर्फे मंत्रालयावर मोर्चा
भाजपाच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्‍नासाठी मंत्रालयावर बुधवारी मोर्चा काढला. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली. राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी गोपिचंद पडळकर आणि किरीट सोमय्यादेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी मोर्चासाठी मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यात एसटी कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याचे आवाहन केलेले आहे. याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणार्‍यांना व विरोधकांवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. कर्मचार्‍यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, असं आवाहन मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.

राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

विलिनिकरणाची तातडीने अशक्य – परब
एसटी कर्मचार्‍यां ची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे.ती तातडीने मंजूर होणे अशक्य आहे, त्यासाठी समिती नेमली आहे. न्यायालयाने दिलेला आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू. भडकवणा-या नेत्याचे नुकसान होत नाही. कामगारांचे नुकसान होत आहे.
अनिल परब ,परिवहन मंत्री

एसटी कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापूर विभागातील एका एस. टी. कर्मचार्‍याने आगारातच गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचार्‍यांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सदानंद सखाराम कांबळे असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. सकाळी कोल्हापूर बस स्थानकात गगनबावडा आगारातील कर्मचारी सदानंद कांबळे यांने रुमालाचा वापर करत गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version