। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा गावाजवळील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी लागलेल्या रांगेत पुढे जाण्याच्या वादातून एका 42 वर्षीय दुचाकीस्वारावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तळोजा उपनगरातील आसावरी सिडको गृहनिर्माण सोसायटीत राहणारा 42 वर्षीय व्यक्ती आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी तळोजा गावालगतच्या भारत पेट्रोलपंपावर गेला होता. त्यावेळी पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची मोठी रांग लागली होती. वाहनचालक आपापल्या क्रमांकाची प्रतीक्षा करत रांगेत उभे होते. याच दरम्यान, अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील एक दुचाकीस्वार रांगेच्या मागील बाजूने येऊन थेट पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने प्रथम पेट्रोल भरण्याचा आग्रह धरत वाद घालण्यास सुरुवात केली. रांगेत उभ्या असलेल्या 42 वर्षीय दुचाकीस्वाराने त्याला याबाबत जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीने आपण स्थानिक गावकरी असल्याचे सांगत गावकऱ्यांना पेट्रोल भरण्यासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे, असा दावा केला. त्यानंतर त्याने संबंधित दुचाकीस्वाराला मारहाण केली. मारहाणीदरम्यान त्याने खिशातून चाकू काढून 42 वर्षीय व्यक्तीच्या छातीवर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली.
पेट्रोल भरण्याच्या रांगेवरून चाकू हल्ला
