मुंब्रा-पनवेल महामार्ग, तळोजा औद्योगिक क्षेत्रातील मार्गांवर शौचालय नाही
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या मुंब्रा-पनवेल मार्गावर सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्याने या मार्गावरून प्रवास करणार्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची होणारी गैरसोय दूर व्हावी याकरिता या मार्गांवर सार्वजनिक शौचालयाची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंब्रा ते पनवेल या जवळपास 25 किलोमीटर लांबीच्या महमार्गांवरून दररोज हजारो वाहन प्रवास करतात. प्रवासादरम्यान मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने प्रवाशांना तासन्तास वाहनात अडकून पडावे लागत असते. अशा वेळी नैसर्गिक विधी उरकण्याची गरज भासल्यास मार्गांवर जवळपास कुठेच स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने पेट्रोल पंप अथवा मार्गांवरील हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या शौचालयांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागतो. यामुळे जेष्ठ नागरिक आणि महिला वर्गाचे मोठे हाल होतात.जेष्ठ नागरिक आणि महिलांना होणारा हा त्रास पाहता मार्गांवर विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सोय उपलब्ध करुण महिला आणि जेष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा प्रवासी आणि वाहन चालक व्यक्त करत आहेत.
शौचालय उपलब्ध करुन देण्याचा टोल कंपनीला विसर
मुंब्रा-पनवेल महामार्गांवर प्रवास करणार्या वाहनांकडून खासगी कंपनीच्या माध्यमातून टोलवसुली केली जाते. सरकारच्या नियमानुसार टोलवसुली करणार्या कंपनीने टोल नाक्यावर सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुण देणे बंधनकारक आहे. असे असताना मार्गांवरील रोहिजण येथील टोलनाक्यावर शौचालय उपलब्ध करुन देण्याच्या नियमाला कंपनीने बगल दिल्याचे पाहायला मिळते.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील मार्गांवरदेखील शौचालयाची गरज
मुंब्रा-पनवेल महामार्गा प्रमाणेच तळोजा औद्योगिक वसाहतमार्गे कल्याण-डोंबिवलीकडे जाणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गांवरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणीदेखील सार्वजनिक शौचालय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
शौचालय उभारण्यासाठी पालिकेचा पाठपुरावा
पनवेल पालिकेच्या माध्यमातून पालिका हद्दीत जवळपास 26 ठिकाणी आद्ययावत स्वरूपाचे स्वयंमचलित सौचालय उभारण्यात येणार आहेत. 16 ठिकाणी कामाला सुरवात देखील करण्यात आली आहे. तळोजा औद्योगिक वसाहती मधून जाणार्या मार्गांवर शौचालय उभारण्याचा पालिकेचा मानस असून, शौचालयासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी एमआईडीसीसोबत पत्रव्यवहार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली आहे. तसेच, जागा उपलब्ध झाल्यास मुंब्रा-पनवेल मार्गांवरदेखील पालिकेच्या माध्यमातून शौचालय उपलब्ध करण्यात येणार आहे.
पेट्रोल पंपावरील शौचालयात अस्वच्छता
महामार्गावर उपलब्ध असलेल्या पेट्रोल पंपात महिला आणि पुरुष वर्गासाठी शौचालय उपलब्ध असणे बंधनकारक असल्याने पेट्रोल पंपात स्वच्छतागृह उपलब्ध आहेत. मात्र, स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवण्यात पेट्रोल पंपचालक दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते.