| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिका प्रशासनाकडून बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेर्यांसह सुरूच आणि अत्याधुनिक पद्धतीचे निवारा शेड उभारले जात आहेत. बसथांब्यावर ओला-सुका कचरापेट्यांसह एलईडी लाइटची सोय असणार आहे. सीसीटीव्हींमुळे गैरप्रकारांना आळा बसणार असल्यामुळे खारघरसह पालिका हद्दीतील प्रवाशांतून समाधान व्यक्त करीत आहे.
खारघर, तसेच बेलापूर रेल्वेस्थानकावरून एनएमएमटी बस खारघर आणि तळोजा परिसरात ये-जा करीत असतात. तळोजा, खारघर वसाहतीमधील रहिवाशांना मुंबई, ठाणे आदी भागात रेल्वेने प्रवास करण्यासाठी खारघर रेल्वेस्थानक एकमेव स्थानक आहे. नोकरी, उद्योग, व्यवसाय, तसेच शाळा, महाविद्यालयीन प्रवाशांची संख्या अधिक आहे. खारघर रेल्वेस्थानकावरून खारघर आणि तळोजा वसाहतीत प्रवास करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वेस्थानकाबाहेर एकमेव निवारा असल्यामुळे अनेक प्रवाशांना बस पकडण्यासाठी उन्हात थांबावे लागत आहे. तसेच खारघर वसाहतीमधील अनेक बसथांबे मोडकळीस आले आहेत.
दरम्यान, खारघर वसाहत पनवेल पालिकेकडे हस्तांतरित झाल्यामुळे एनएमएमटी प्रशासनाने निवारा शेडकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसात अनेक बसथांब्यांवर निवारा शेडविना बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. पनवेल पालिका प्रशासनाने प्रवाशांची दखल घेऊन पालिका हद्दीत सर्वेक्षण केले असता 370 बसथांबे सर्वेक्षण पाहणीत आढळून आले. पालिका हद्दीतील बसथांब्यांवर निवारा शेड उभारणीचे काम खारघरमधून सुरू करण्यात आल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.