| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील दिघीपोर्ट मधील आगरदांडा युनिट सुरु करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जावा,अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. याबाबत खा.सुनिल तटकरे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
आगरदांडा भागातील बंदर विकासाचे जोरदार सुरु व्हावे व या भागाचा कायापालट होण्यासाठी काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येऊन काही दिवसापूर्वीच सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली होती.
आगरदांडा येथील काम जलद गतीने सुरु होण्यासाठी कृती समितीचे प्रमुख मंगेश दांडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा.तटकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी तालुका काँग्रेस आय चे अध्यक्ष सुभाष महाडिक, शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुरुड तालुका प्रमुख नौशाद दळवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष किरण नाईक, राष्ट्रवादी अलिबाग -मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृती समितीचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले की, आगरदांडा भागातील बंदर विकासाची कामे न झाल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. स्थानिक तरुणांना नोकर्या व स्वयंरोजगार मिळण्यासाठी सदरच्या पोर्ट च्या विकासाचे काम जलद गतीने होणे खूप आवश्यक आहे. आगरदांडा बंदर विकासाचे काम जलद गतीने होण्यासाठी कृती समिती सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे सुचित करण्यात आले.
यावेळी तटकरे यांनी उपस्थित शिष्ठमंडळास कंपनी व्यवस्थपणासोबत लवकरच मिटिंग लावून सदरचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.