बाजारपेठा हाऊसफुल्ल,लाखोंची उलाढाल
अलिबाग | भारत रांजणकर |
सजले अंगण रंगावलीने
उजळले दीप चोहोबाजूने
उत्साहाचा सण दिव्यांचा
साजरा करु आनंदाने…
अंध:काराचा नायनाट करीत,लाखो पणत्यांच्या प्रकाशांनी उजळून जाणार्या दीपोत्सवास अर्थात दिवाळीच्या मंगलमय सणास अलिबागसह संपूर्ण रायगडात उत्साहात प्रारंभ झाला असून, यानिमित्त खरेदीसाठी बाजारात मोठया प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्हाभरात पहायला मिळत आहे. कोरोना रुग्ण कमी होत असतानाच दिवाळीचा उत्साह मोठया प्रमाणावर दिसत आहे.
मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा हाऊसफुल्ल होत्या. सर्वात जास्त गर्दी कपड्यांच्या दुकानात पहायला मिळत आहे. तसेच ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल आठ दिवसांपासूनच लागले आहेत. आकाश कंदिलांनी तसेच विविध रोषणाईच्या माळा, कंदिल यांच्या झगमगाटाने सर्वच दिपून गेले आहेत. भाऊबिज तसेच दिवाळीनिमित्त आपापसात भेटी देण्यासाठी ड्रायफ्रुटस, मिठाई, विविध वस्तूंच्या दुकानावर गर्दी होत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी देखील झुंबड उडाली होती. दिवाळीच्या या दोन दिवसात सर्वच बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल झाली. ग्राहकांची खरेदीसाठीची लगबग आणि दुकादारांची धावपळ, असा माहोल दिसत आहे. मुख्य मार्गावरच्या बाजारपेठांमध्ये सोने, कपडे विक्रीत 15 टक्के वाढ आहे. सोने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिवसागणिक वाढत असल्याचे धनत्रयोदशीला झालेल्या विक्रीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. गुंतवणूक म्हणून एक, दोन ग्रॅम सोन्याची खरेदी करतात. अनेकांनी ऑर्डर देऊन दागिने लक्ष्मीपूजनाला नेण्याचे बेत आखले आहेत.
दिवाळीत बच्चे कंपनी बनवत असलेले किल्ले आता तयार उपलब्ध होत आहेत.त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, मावळे, प्राणी, सैनिक देखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या खरेदीसाठी देखील मोठी गर्दी होत आहे.