इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखा सुरू करा

सुधागड मराठा समाजाची मागणी

| पाली | प्रतिनिधी |

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी-बारावीच्या कॉमर्स शाखेचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुरू करावे, अशी आग्रही मागणी सुधागड तालुका मराठा समाजाने केली आहे. यासंदर्भात मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या अध्यक्षा गीता पालरेचा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सुधागड तालुका मराठा समाज व सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीता पालरेचा यांच्यात झालेल्या बैठकीत आगामी अकरावी प्रवेश प्रक्रिया, इतर शैक्षणिक प्रवेश तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गरीब, गरजू तसेच कोणतीही ओळख नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया अधिक सुटसुटीत व पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन सौ. पालरेचा यांनी दिले.

सध्या पाली येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेचे शिक्षण मराठी माध्यमातून दिले जात आहे. मात्र, बदलत्या शैक्षणिक आणि स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची गरज भासत असल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. पालीमध्ये दहा-वीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा कार्यरत असल्याने तेथील विद्यार्थ्यांनाही अकरावी बारावीसाठी इंग्रजी माध्यमातील कॉमर्स शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या भेटीप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर, सरचिटणीस सुजित बारसकर,रमेश लखीमले अशोक शिंदे, नरेश शेडगे, अविनाश पवार, मिलिंद शिंदे, केतन म्हसके, शुभदा पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version