ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, डंपर रोडरोलरची वाढली मागणी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. खरिपाचा हंगाम असल्याने बळीराजा शेतीच्या कामात व्यग्र झाला आहे. त्याबरोबरच मातीचे भराव व खोदकाम, नालेसफाई, बांधकाम व रस्ते निर्मिती आदी कामे सुद्धा पुर्णत्वास नेण्याची अनेकांची लगबग सुरु आहे. या कामासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री आवश्यक आहे, हि सर्व कामे जलद व योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन व रोड रोलर, डंपर आदी आधुनिक यंत्रसामग्री व साधनांची मागणी खूप वाढली आहे. मात्र डिझेल व पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने या साधने व यंत्रांच्या भाड्यातही मागील वर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. शिवाय ही साधने चालविणार्या ऑपरेटर व चालकांची देखील कमतरता भेडसावत आहे.
पावसाळयात अनेक जण, शेतकरी तसेच फार्महाऊसवाले व खाजगी विकसक आपल्या जमीनीवर भराव टाकणे, रस्ता करणे, चर खोदणे, डोंगर व दगड फोडणे, वृक्षलागवडीसाठी जागा तयार करणे अशी कामे करतात. तसेच सरकारकडून विविध रस्ते बांधणी, नालेसफाई, विहीरी बांधणे, बंधारे घालणे, नवीन गटारे बांधणे आदी कामे सुरु आहेत. या सर्व कामांसाठी मजुरांबरोबरच विविध आधुनिक साधने आवश्यक असतात त्यामध्ये जेसीबी, पोकलेन, रोडरोलर, डंपर, ट्रॅक्टर, डंपर, ब्रेकर यांचा समावेश आहे. हि किंमती आणि मोठी साधने सर्वच ठेकेदार किंवा सर्वसामान्य माणसे विकत घेवु शकत नाहीत. त्यामुळे ती भाड्यानेच घ्यावी लागतात. परिणामी या सर्व यंत्र मालकांकडे व ऑपरेटरकडे सध्या खूप कामे आहेत. मात्र मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने सध्या या यंत्रसामग्रीचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे कामांना दिरंगाई होते.
सध्या जेसीबी व इतर यंत्रसामग्री चालविणार्या ऑपरेटर व ड्रायव्हरची खूप कमतरता आहे. स्थानिक व आदिवासी तरुणांनी ही यंत्रसामग्री चालविण्याचे कौशल्य शिकल्यास त्यांनाही चांगला रोजगार मिळेल आणि कामे देखील सुरळीत होतील.
दिपक कोकरे, सुशिक्षित व प्रयोगशील शेतकरी, सुधागड
डिझेल व पेट्रोलच्या भाववाढीचा फटका
डिझेल व पेट्रोलच्या भाववाढीमुळे आपोआप ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन, ट्रेलर, डंपरच्या भाड्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षी तासी 800 रुपये भाड्याने मिळणार जेसीबी आता 1200 ते 1300 रुपये तासी भाड्याने मिळत आहे. इतर सामग्री व वाहनांचे भाडेही वाढले आहे. तरी देखिल या सामग्रीची मागणी वाढली असल्याने हा व्यवसाय करणार्यांचा धंदा मात्र सध्या तेजित आहे.