भारत पेट्रोलियम, शिवशक्ती आंबेकर चषकाचे मानकरी
| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रीय मिल मजदूर संघाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्यावसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम व शिवशक्ती महिला संघाने विजेतेपद पटकाविले. भारत पेट्रोलीयमचा रिशांक देवाडीगा पुरुषांत, तर शिवशक्तीची पूजा यादव महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोघांना प्रत्येकी रोख रु.पाच हजार (5,000/-) देऊन गौरविण्यात आले.

ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे संपन्न झालेल्या व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलीयमने बँक ऑफ बडोदाचे आव्हान 27-17 असे परतवून लावत रोख रु. पन्नास हजा व ग. द. आंबेकर चषकावर आपले नाव कोरले. उपविजेत्या बँकेला चषक व रोख रु. पंचवीस हजारावर संतुष्ट व्हावे लागले. सुरवात आक्रमक करीत भारत पेट्रोलियम संघाने बॅँकेवर पहिला लोण चढवित आघाडी घेतली. विश्रांतीला 18-11 अशी आघाडी पेट्रोलियम संघाकडे होती. उत्तरार्धात सावध खेळ करीत ही आघाडी टिकविली. अक्षय सोनी, रिशांक देवाडीगा यांच्या संयमी व कल्पक चढाया, त्याला विशाल माने यांनी भक्कम बचाव करीत दिलेली उत्तम साथ यामुळे हे शक्य झाले. बॅँकेच्या नितीन देशमुख, साहिल राणे यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला.
महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघाने डॉ.शिरोडकर स्पोर्ट्सचा प्रतिकार 38-16 असा लीलया मोडून काढल विजेतेपद पटकाविले.
उपांत्य उपविजयी चारही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. अकरा हजार (11,000/-) देऊन सन्मानित करण्यात आले. बँक ऑफ बडोदाच्या नितीन देशमुख व साहिल राणे हे व्यावसायिक पुरुषांत स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. तीन हजार (3,000/-) देऊन गौरविण्यात आले. डॉ. शिरोडकरची मेघा कदम व शिवशक्तीची पौर्णिमा जेधे महिलांत स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरल्या. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. तीन हजार (3,000/-) प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस आ.सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महेश सावंत, मीनानाथ धानजी, शिवछत्रपती पुरस्कार आनंदा शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.