शिक्षकासाठी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

। तळा । प्रतिनिधी ।

तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या दगडी शाळेला शिक्षक मिळावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकवर्गाने मंगळवारी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांना निवेदन दिले. रायगड जिल्हा परिषदेची दगडी शाळा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा असून पहिले अर्थमंत्री डॉ.सी. डी. देशमुख यांनी देखील याच शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण घेतले आहे. मात्र याच शाळेला शिक्षक मिळावा यासाठी येथील शाळा व्यवस्थापन समितीला गेली दोन वर्षे संघर्ष करावा लागत आहे.

सध्या सर्वत्र मराठी शाळांची पटसंख्या कमी होत असताना तळा शहरातील दगडी शाळेच्या पटसंख्येचा आलेख गेल्या पाच वर्षात सतत चढता आहे. आजमितीला या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या शंभरच्या आसपास असून केवल दोन शिक्षकांवर या विद्यार्थ्यांचा भार आहे. त्यामुळे शाळेला शिक्षक मिळावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग सातत्याने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करीत आहेत. मात्र गटशिक्षणाधिकारी या सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष न देता केवल आश्‍वासन देऊन समाधान करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर मंगळवारी शाळा व्यवस्थापन समिती व पालकवर्गाने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन रागाचा पाढा वाचला. त्यावर गटशिक्षणाधिकारी कुलदीप बोंगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एक शिक्षक मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली.

तसेच येत्या आठवडा भरात आणखी एक शिक्षक शाळेला देण्यात येईल असे आश्‍वासन दिले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मीरा शिगवण, भास्कर गोळे, नरेश सुर्वे यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version