। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव बस स्थानकातील रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला असून जागोजागी भले मोठे खड्डे पडून त्यांत पावसाचे पाणी साचले आहे.या खड्ड्यांमुळे वाहनचालक,प्रवासी,विद्यार्थी,नागरिक त्रस्त झाले असून या समस्येबाबत माणगाव तालुका भाजपतर्फे संजय आप्पा ढवळे यांनी माणगाव आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांना दि.27 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन याबाबतीत परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
बसस्थानकातील खड्ड्यांंच्या या समस्येबाबत प्रसार माध्यमांजवळ बोलताना संजय अप्पा ढवळे यांनी सांगितले की स्थानकाच्या आवारातील संपूर्ण रस्ता चांगल्या दर्जाचा होणे आवश्यक आहे. येथील रस्त्याचे काम चांगले करा अन्यथा 1 नोव्हेंबर रोजी बसेस आडवुन रस्ता रोको आंदोलन अटळ असल्याचे सांगितले.आगार प्रमुखांना निवेदन देताना बाबुराव चव्हाण,संजय जाधव,अरूण पेणकर,रेश्मा मोहिते आदि उपस्थित होते.