कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा

22.30 ग्रॅम मेथॅम्फेटामाईन जप्त

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील हालिवली येथील गृहसंकुलात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कर्जत पोलिसांच्या मदतीने धाड टाकून 22.30 ग्रॅम मेथॅम्फेटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत सेनेगल देशातील नागरिक असलेल्या सीसे सॅडिओ (33) याला ताब्यात घेण्यात आले असून, जप्त अमली पदार्थाची अंदाजे किंमत 66 हजार 900 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हालिवली येथील सिग्नेचर डिझायर सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 102 मध्ये सॅडिओ हा गेल्या वर्षभरापासून राहात असल्याचे तपासात समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला बाणेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद शेख याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर कर्जत परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता 22.30 ग्रॅम मेथॅम्फेटामाईन आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून अमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू असून, ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित फ्लॅट चेंबूर येथील अजय सोनवणे यांनी भाड्याने दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे फ्लॅट भाड्याने देताना करण्यात आलेली प्रक्रिया, भाडेकरूची कागदपत्रे तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. कर्जत परिसरातील गृहसंकुलात अमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली असून, या अमली पदार्थांच्या साखळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Exit mobile version