चोरीला गेलेल्या बकर्‍या सापडल्या;तिघांना अटक

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील आदिवासी शेतकर्‍यांच्या तीस दुभत्या बकर्‍या चोरीला गेल्या होत्या. त्यापैकी वीस बकर्‍या तब्बल चार महिन्यांनी सापडल्या. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली असून उर्वरित 10 बकर्‍यांचा शोध सुरु आहे.

बेडीसगाव येथील नितीन राघो मेंगाळ यांचा बकर्‍या पालनाचा व्यवसाय आहे. 14 एप्रिल रोजी त्यांची आई 30 दुभत्या बकर्‍या घेऊन जंगलात चरायला घेऊन गेली होती. त्यांना चरण्यासाठी बाजूला असणार्‍या टेकडीवर सोडण्यात आले. सायंकाळी बकर्‍या परत आणण्यासाठी ताई राघो मेंगाळ गेल्या असता बकर्‍या सापडल्या नाहीत. त्यांनी शोध घेतला; मात्र त्या सापडल्या नाहीत. याबाबत त्यांनी वाळकू पुंजारा, गावातील राहणारे रामा सदू निरगुडा, भानूदास निरगुडा, किसन निरगुडा यांना सांगितली.

त्यानंतर सर्वांनी जंगलात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. जंगल भाग मोठा असल्याने जंगलात रस्ता चुकल्या असतील आणि त्या घरी परत येतील म्हणून त्यांची वाट पाहिली. शेवटी 30 बकर्‍या बेडीसगाव जंगलात हरवल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाली होती. या बकर्‍या दामत गावातील सलमान खुर्चीत नजे, फासान नशिम मजे आणि दिशान लियाकत टिवाले यांनी चोरुन आणल्या होत्या आणि त्यांची कळंब येथे विक्री केल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार कारवाई करीत या तिघांना अटक करण्यात आली.

Exit mobile version