| नागोठणे । वार्ताहर ।
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर रविवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. रोहा तालुक्यासह नागोठणे परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे सुकेळी खिंडीमध्ये डोंगरमाथ्यावरून मोठ-मोठे दगड-गोटे महामार्गावर आल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता; परंतु ऐनघर पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने हे दगड बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे; तर दुसरीकडे महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. अपघातासाठी धोकादायक असलेल्या सुकेळी खिंडीत डोंगरमाथ्यावरून दगड घरंगळत आल्याने वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या होत्या.
याबाबत माहिती मिळताच, ऐनघर पोलिस चौकीचे कर्मचारी व खैरवाडी आदिवासी वाडीतील तरुण भाळचंद्र वारगुडे, प्रथमेश पाधीर, सागर वारगुडे, साहिल वारगुडे, कल्पेश शिद, पार्थ पाधिर, प्रेम हंबीर या तरुणांनी रस्त्यावरील दगड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.