चाचण्या आवरा रेल्वे सुरू करा

| उरण | वार्ताहर |

उरण रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्येक महिन्यातील तारखेला उरण रेल्वे सुरू असल्याचे वृत्त येते. आजवर रेल्वे प्रशासनाने अनेक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र रेल्वे प्रत्यक्षात धावायला किती वेळ लागेल? याबाबत उत्तर अद्याप तरी अस्पष्टच आहे. यामुळे आता चाचण्या आवरा आणि उरण-नवी मुंबई रेल्वे सुरू करा, अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत.

सिडको व रेल्वेच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेल्या 1782 कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण हा 27 किमी लांबीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मार्गाला 1967 सालीच मंजुरी मिळाली, मात्र कामाची सुरुवात करण्यासाठी तब्बल अनेक वर्षं वाट पाहावी लागली. कधी वन, पर्यावरण, खारफुटींचे तर खासगी जमिनी संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून होणारा विरोध यामुळे पहिल्याच टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी 2018 पर्यंत वाट पाहावी लागली. या पहिल्या टप्प्यातील 27 किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील 11 स्थानकांपैकी नेरुळ, सीवूड, सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा 12.5 किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान 15 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेशन उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, उड्डाण पूल उभारण्याच्या कामांनी वेग घेतला आहे. कामात होणारा विलंब खर्चाच्या वाढीस कारणीभूत ठरत असल्याने मध्यरेल्वे प्रशासनानेही कामाचा वेग वाढविला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनीही दुसऱ्या टप्प्यातील रखडलेली कामे पूर्ण करुन नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची 22 सप्टेंबर 2022 पर्यंतची डेडलाईन याआधीच जाहीर केली होती.

उरण-नेरुळ रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात उरण रेल्वे ही प्रवाशी नागरिकांसाठी सुरू होणार आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण-नेरुळ रेल्वेच्या उद्घाटन समारंभ रखडला होता. आता कर्नाटकमधील निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याने पुढील महिन्यात उरण रेल्वे सुरू होणार असल्याचे मत उरण रेल्वेचे अधिकारी विजयकुमार यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version